आतापर्यंत ४१३ पैकी ६१ इमारती अतिधोकादायक, २९३ इमारतींच्या सर्वेक्षणाच्या अहवालाची प्रतीक्षा

वसई : वसई-विरार महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील ७०६ धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यातील ४१३ इमारतींच्या आलेल्या अहवालात ६१ इमारती अतिधोकादायक तर ५८ या धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. २९३ इमारतींच्या सर्वेक्षणाचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती व बांधकामे आहेत. काही इमारतींचे बांधकाम हे फारच जीर्ण झाल्याने त्या धोकादायक अवस्थेत आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने शहरातील  धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचे  सर्वेक्षण व लेखापरीक्षण करण्याचे काम नऊ प्रभागात सुरू केले होते. यात २०२५-२६ या वर्षात ७०६ इतक्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी ४१३ अहवाल प्राप्त झाला आहे.

धोकादायक असलेल्या इमारतींची चार प्रकारात वर्गवारी केली जात असते.यामध्ये अतिधोकादायक असलेल्या इमारती तात्काळ खाली करून जमीनदोस्त करायच्या असतात तर दुसऱ्या वर्गातील इमारती खाली करून त्या दुरुस्त केल्या जातात, तिसऱ्या वर्गात इमारती खाली न करता दुरुस्त केल्या जातात तर चौथ्या वर्गात इमारतींची डागडुजी केली जाते. यावर्षी सर्वेक्षणात आतापर्यंत ६१ इमारती अतिधोकादायक आहेत यातील सर्वाधिक अतिधोकादायक इमारती या प्रभाग समिती अ आणि ई मध्ये आहेत.

तर धोकादायक मध्ये ५८ व सी टू बी मध्ये २९४ इतक्या इमारतींचा समावेश असल्याचे पालिकेने सांगितले आहे. अतिधोकादायक अवस्थेत असलेल्या इमारती खाली करून त्या जमीनदोस्त करण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली जाणार आहे असे महापालिकेचे उपायुक्त दीपक सावंत यांनी सांगितले आहे. ज्यांच्या ३० वर्षाहून अधिक जुन्या इमारती झाल्या आहेत त्यांनी स्वतः हून त्याचे लेखा परीक्षण करवून घ्यावे अशा सूचना ही पालिकेने केल्या आहेत.

अतिधोकादायक व धोकादायक प्रवर्गातील इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण पूर्ण केले आहे.नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने धोकादायक इमारती खाली कराव्यात जेणेकरून भविष्यातील दुर्घटना टाळता येईल असे आवाहन करीत आहोत.:- अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका

अति धोकादायक वर्गवारीत मोडणाऱ्या इमारती या पालिकेकडून जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.मात्र त्यानंतरजागेचा मूळ मालक किंवा संबंधित विकासक पुन्हा त्या ठिकाणी पुनर्विकास करण्यास अडथळे निर्माण करण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मूळ सदनिकाधारकांना त्यांची सर्व कागदपत्रे तपासून त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ते या इमारतीत राहत असल्याचा पुरावा म्हणून वापरता येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

धोकादायक व अतिधोकादायक इमारतीमध्ये रहिवासी राहत आहेत. त्यांना पालिकेच्या वतीने इमारत खाली करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे जरी असले तरी या नागरिकांच्या राहण्याची सोय कशी केली जाईल व इमारती खाली करून कोणत्या ठिकाणी राहायचे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालिकेकडे संक्रमण शिबीर नाही तसेच त्याची कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी राहण्याची सुविधा करण्याची तरदूत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

प्रभाग      अतिधोकादायक    ए –              ११                   बी –              ०३               सी-              ०८                 डी-               ०३                   ई-                १५                     एफ –            ०२                   जी –             ०७                     एच –             ०५                   आय-            ०७                   

एकूण          ६१

वादळीवाऱ्याचा अर्नाळा किल्ल्याच्या किनारपट्टीला फटका, वाऱ्यामुळे ७ ते ८ घरांचे नुकसान

वसई: मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम आहे. याचा मोठा फटका किनार पट्टीच्या भागाला बसत आहे. शुक्रवारी सायंकाळी सुटलेल्या वादळी वाऱ्यात अर्नाळा किल्ला येथील घरांच्या वरील पत्रे उडून गेल्याने सात ते आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या ५ ते १० मिनिटे झालेल्या वादळाने होत्याचे नव्हते केले अशी प्रतिक्रिया येथील नुकसानग्रस्तांनी दिली आहे.

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला आहे. हे गाव एका बेटावर असल्याने येथील नागरीकांना बोटीतून ये जा करावी लागत आहेत. या भागातही मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव राहतात. गाव बेटावर असल्याने दररोजच येथील नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात या भागात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. मागील काही दिवसांपासून वसई विरार मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे सत्र सुरूच आहे. नुकताच प्रादेशिक हवामान विभाग, मुबंई द्वारे पुढील काही दिवसात विजांच्या कडकडाटासह जोराचे वादळी वारे व पावसाचा इशारा देण्यात आला होता.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास किनार पट्टीवर जोराचे वादळी वारे आले. या वादळी वाऱ्यात अर्नाळा किल्ल्याच्या अगदी किनाऱ्या जवळ राहणाऱ्या घरांना याचा मोठा फटका बसला. अनेक घरावरील पत्रे उडून दुसऱ्यांच्या घरावर गेले त्यामुळे सात ते आठ घरांचे नुकसान झाले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. याशिवाय मंदिराजवळील ध्वज खांब ही वाकला आहे. समुद्र खवळलेला असल्याने लाटांचे तडाखे ही जोराने बसत होते. या झालेल्या नुकसान ग्रस्त नागरिकांचे शासनाने त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निनाद पाटील यांनी केली आहे.

आतापर्यंत विविध प्रकारच्या वादळी वाऱ्याने किनार पट्टीच्या भागाचे फारच नुकसान केले आहेत. त्यातून ही सावरून पुन्हा उभे राहण्याची प्रयत्न येथील नागरिक करतात. परंतु पावसाळा व वादळी वारे याचा इशारा मिळताच धडकी भरते अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे. कारण किनार पट्टीवर वादळी व वारे व पाऊस फारच वेगाने कोसळतो. जर अगदी मोठे वादळ येते तेव्हा नुकसान होईल याची भीती सतावत असेही येथील नागरिकांनी सांगितले आहे.

शेतात तुटलेल्या विजवाहक तारा, वसईत २२ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वसई: वसई पश्चिमेच्या मर्सेस रानशेत वाडी भागात महावितरणच्या तुटलेल्या विद्युत वाहक तारेचा स्पर्श होऊन एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७.३० सुमारास ही घटना घडली. हा तरुण जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. त्या ठिकाणी विद्युत वाहक तुटून तार पडून असल्याने ही घटना घडली आहे.

सूरज कुमार (२२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून वसई पश्चिमेच्या मर्सेस भागातील रानशेतवाडी येथील शेतात नेहमी प्रमाणे चारा आणण्यासाठी गेला होता. शेतात महावितरणची विद्युत वाहक तार तुटून पडली होती. व त्यातून प्रवाह सुरूच होता. याच दरम्यान चारा गोळा करताना सूरज याचा स्पर्श विद्युत वाहक तारेला होताच जोराचा धक्का बसला. यातच सूरज याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी वसई पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी पाठविला असून पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी सांगितले आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांना ही घटनास्थळी बोलवून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा महावितरणचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या घटनेनंतर महावितरणच्या कारभारा विरोधात गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी सुद्धा वसई विरारच्या विवीध ठिकाणच्या भागात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरणच्या विद्युत वाहक तारांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बसप्रवासात महिलांना मिळणार ५० टक्के सवलत, वसई विरार महापालिकेचा निर्णय ; १ जून पासून सवलत लागू होणार

वसई : महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय वसई विरार महापालिकेने घेतला आहे. येत्या १ जून पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागा कडून सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ७५ ते ८० हजार इतके प्रवासी प्रवास करतात

त्यात महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. यातील बहुतांश महिला या नोकरदार आणि सर्वसामान्य घरातील आहेत. त्यामुळे त्यांना बस प्रवासात सवलत देण्याची मागणी करण्यात येत होती. ज्याप्रमाणे एसटी महामंडळाने राज्यातील एसटी प्रवासात ५० टक्के दिली आहे. त्याच धर्तीवर पालिकेने आपल्या परिवहन सेवेच्या बस मध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत आयुक्त अनिलकुमार पवार यांनी १ जून २०२५ पासून महिला प्रवाशांना परिवहन सेेवेच्या बस मध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.महापालिकेच्या या निर्णयामुळे बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या रोजच्या प्रवासाचा आर्थिक बोजा हलका होणार आहे. तसेच कामगार महिला, विद्यार्थीनी आणि दररोज बसने प्रवास करणाऱ्या महिलांना या सवलतीचा थेट लाभ घेता येणार आहे.

परिवहन विभागाकडून विविध सवलतीच्या योजना राबवल्या जातात. त्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कर्करोग रुग्ण आणि डायलिसिस रूग्ण करोनामुळे पालक गमावलेली मुले, अनाथ, आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांना तसेच इंग्रजी वगळता अन्य माध्ममांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा दिली जात आहे असेही पालिकेने सांगितले आहे.

रेल्वेत मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना, पाच महिन्यात मीरारोड ते वैतरणा दरम्यान १८० मोबाईल चोरीच्या घटना

वसई :  रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत मागील पाच महिन्यात मोबाईल चोरीचे १८० गुन्हे घडले आहेत. वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत  मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. मागील काही वर्षांपासून या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.याच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा भुरट्या चोरांनी घेतला आहे. मोबाईल चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडत आहेत. 

विशेषतः गर्दीच्या स्थानकात अशा प्रकारच्या घटना अधिक होत आहेत.विशेषतः विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या स्थानकात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. चोरीच्या घटनांमध्ये रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्याच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी हे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात करीत आहेत.

आतापर्यंत मीरा रोड ते वैतरणा या स्थानकांच्या दरम्यान १८० इतक्या मोबाईल चोरी होण्याच्या घटनांची नोंद केली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त घालणे, अधूनमधून संशयितांची तपासणी, जनजागृती मोहीमा असे उपक्रम राबविले जात आहेत असेही रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

रेल्वेत ही चोरीच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः पाकीट मारी आणि मोबाईल या चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेतली पाहिजे.भगवान डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई रेल्वे

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. पोलिसांकडून रेल्वे स्थानकात गस्त जरी घालत असली तरी अनेक घटना पटकन नजरेस पडत नाहीत.त्यामुळे रेल्वे स्थानकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे एकप्रकारे तिसरा डोळा म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणे सोपे जाते.  त्यामुळे बहुतांश गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश येत आहे.

चिंचोटी कामण – भिवंडी  रस्त्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

वसई: चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संतप्त झालेले नागरिकांनी सोमवारी चिंचोटी येथे रास्ता रोको आंदोलन केले. दोन तासांहून अधिक  या आंदोलनकर्त्यांनी हा राज्य मार्गाचा रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे अपघात ही घडतात. तर दुसरीकडे धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र तरीही या रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. आता तर पावसाळा सुरू झाला आहे तरीही रस्त्याची अवस्था बिकटच आहे.

सोमवारी सकाळी १० वाजता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिंचोटी नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात शेकडो संख्येने कॉंग्रेसचे कार्यकर्ते, नागरिक, वाहन चालक यात सहभागी झाले होते.  मागील अनेक वर्षपासून या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी संघर्ष करीत आहेत. परंतु प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला.

चिंचोटी-कामण-भिवंडी हा दोन जिल्हाला जोडणारा महत्वाचा महामार्ग असून मागील अनेक वर्षापासून तो नादुरुस्त आहे. या रस्त्यावरुन वाहन चालविणे फार धोकादायक झालेले आहे. या रस्त्यावरती लहान मोठे असे शेकडो अपघातही झालेले आहेत. परंतु सातत्याने मागणी होऊनही अत्यंत महत्वाचा रस्ता आजपर्यंत दुरुस्त झालेला नाही. रस्त्याचे नूतनीकरण होणार म्हणून अनेक वेळा घोषणा झाली, कॉंक्रिटिकरणं होणार म्हणून ही घोषणा झाल्या परंतु काँक्रिटीकरणाच्या नावाखाली चार-पाच ठिकाणी कॉक्रिटीकरणाचे कामही चालू झाले, आणि ते काम आजपर्यंत पूर्ण झालेच नाही असे आंदोलनकर्ते समीर वर्तक यांनी सांगितले आहे.

आजही येथील नागरिक व येथून ये जा करणारे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. यासाठी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी आमची प्रमुख मागणी आहे असेही वर्तक यांनी सांगितले. दोन तासाहून अधिक काळ आंदोलन कर्त्यानी महामार्ग रोखून धरल्याने वसईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

क्लस्टर योजनेत समाविष्ट असलेल्या रहिवाशांचा विरोध, दोन वर्षांपासून कोणतीही प्रगती नसल्याचा आरोप

भाईंदर: शासनाच्या क्लस्टर योजनेत समाविष्ट होऊन दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही कोणतीही प्रगती झालेली नाही. परिणामी जुन्या इमारतींची पडझड सुरु झाली असून दुर्घटना घडण्याची भीती डोक्यावर असल्यामुळे भाईंदर मधील रहिवाशांनी विरोध दर्शवत योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरा भाईंदर शहरासाठी क्लस्टर योजना मंजुर झाली आहे. महापालिकेकडून २४ ठीकाणी क्लस्टर योजना राबवण्यासाठी आराखडे निश्चित करून याबाबतची अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शहरातील जुन्या गृह-संकुलांना  आणि झोपडपट्टी भागांना क्लस्टर योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आता क्लस्टरसाठी पात्र ठरलेल्या ठिकाणांपैकी प्रथम सात ठिकाणीच प्राधान्याने  योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्षेत्रात पुढील प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून पावले उचलली जात आहेत. यासाठी शासनाकडून १० कोटी रुपयांच्या निधी देण्यात आला असून महापालिकेने सर्वेक्षण करण्यासाठी ‘मे. टेककॉम अर्बन मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस’ या कंत्राटदाराची निवड केली आहे. यात सर्व प्रथम यास पात्र ठरलेल्या क्षेत्राचे एकात्मिक सर्वेक्षण केले जाणार आहे. यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने  भौतिक क्षेत्र ठरवून  त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे बायोमॅट्रिक व बांधकामचे सर्वेक्षण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.प्रामुख्याने २०२२ पुर्वीपासून अस्तित्वात असलेली बांधकामे ही या योजनेस पात्र ठरवली जाणार आहे.

त्यानुसार मागील तीन वर्षांपासून हे काम सुरु आहे.मात्र आता योजनेत समाविष्ट असेलेल्या भाईंदर पश्चिम येथील देवचंद नगर येथील रहिवाशांनी यातून बाहेर पडण्याचा एकत्रित निर्णय घेतला आहे. कामाच्या रखडपट्टीमुळे या योजनेचे भविष्य दिसून येत नसून राहते घर देखील कोसळून जाण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.रहिवाशीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहरभरात क्लस्टर योजना राबवण्यात अडथळे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाईंदर पश्चिम येथील देवचंद नगर भागात तीस वर्षाहून अधिक जुन्या इमारती आहेत.यातील १५ ते २० इमारतीचा समावेश शासनाच्या क्लस्टर योजनेमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार आता योजनेमार्फतच इमारतीचा पुनर्विकास करण्याचे धोरण आहे. परंतु मागील दोन वर्षापासून प्रत्यक्ष या योजनेसंदर्भात शासनाकडून कोणतेही काम करण्यात आलेले नाही.

परिणामी योजना एकप्रकारे रखडून गेली आहे. दरम्यान याच कालावधीत येथील अनेक इमारती धोकादायक व अतिधोकादायक श्रेणीत येऊ लागल्या आहेत. त्यामुळे याचा पुनर्विकास करणे गरजेचे ठरत आहे. परंतु योजनेत समाविष्ट असल्यामुळे या इमारतींना स्वतंत्र पुनर्विकास करण्याची परवानगी दिली जात नाही आहे.

त्यामुळे येथील बहुतांश इमारतीधारकांनी रविवारी एकत्रित जाहीर बैठक घेऊन या योजनेला विरोध दर्शवून यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.महत्वाची बाब म्हणजे नागरिकांच्या या मागणीला भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील समर्थन दिले असून याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे.

विरार मध्ये स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू; विरारच्या गोपचरपाडा पूजा अपार्टमेंट इमारतीतील घटना

वसई: विरार येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मी राजकुमार सिंग(२७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरात स्लॅब कोसळण्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे.विरार पूर्वेच्या गोपचर पाडा भागात मकवाना कॉम्प्लेक्स, रामू कंपाऊंड परिसरात पूजा अपार्टमेंट इमारत आहे. या इमारतीत लक्ष्मी सिंग ही आपल्या कुटुंबासोबत ३३५ या क्रमांकाचा सदनिकेत राहत होती.सोमवारी दुपारी ती आपल्या दोन मुलांच्या सोबत झोपली होती. त्याच दरम्यान अचानकपणे सदनिकेच्या वरील जीर्ण झालेल्या स्लॅब तिच्या अंगावर कोसळला यात ती गंभीर जखमी झाली होती.

शेजारच्या रहिवाशांनी तिला विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा यात मृत्यू झाला.या घटनेनंतर पालिकेने या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना खाली करून अन्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे.या प्रकरणी विरार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेच्या मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम तुरे यांनी दिली आहे.

यापूर्वी नालासोपाऱ्यात नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील साई सिमरन इमारतीत सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने धोकादायक व जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई विरार शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. आता जी दुर्घटना घडलेली इमारत आहे त्यांना सुद्धा खाली करण्याच्या संदर्भात नोटिसा दिल्या जातील असे सहायक आयुक्त गिल्सन  गोन्सालवीस यांनी सांगितले आहे.

सायकल ट्रॅकवर नालेसफाईचा गाळ, फेरफटका मारणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय

वसई: वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक वॉक करण्यासाठी सायकल ट्रॅकवर येतात. मात्र नालेसफाईच्या दरम्यान निघालेला गाळ हा थेट सायकल ट्रॅकवर आल्याने वॉक करण्यासाठी व सायकल चालविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. त्यातच आता पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण सायकल ट्रॅक चिखलमय झाला आहे.

वसई पश्चिमेतील परिसरात सनसिटी परिसरातून गास गावाकडे जाणार रस्ता आहे. हा रस्ता अतिशय मोकळा व येथील वातावरण ही मोकळे आहे. या रस्त्यावर नागरिकांना विनाअडथळा सायकल चालविता यावी यासाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. यासाठी पालिकेने ७२ लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे.

सध्या शहरात प्रदूषणाचे वाढते प्रमाण  रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्य सदृढ राहण्यासाठी पालिकेने हा प्रकल्प उभारला आहे.सनसिटी येथील सायकल ट्रॅक वर दररोज सकाळ- संध्याकाळ हजारोच्या संख्येने नागरिक धावणे, वॉक, सायकलिंग यासाठी येत असतात. मात्र या सायकल ट्रॅक ला लागूनच नाला गेला आहे. या नाल्याची पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईचे काम सुरू आहे. त्यातून निघालेला गाळ हा कडेला टाकून देण्यात आला होता.

नुकताच पालिकेने तो गाळ उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र गाळ उचलताना योग्य ती काळजी न घेतल्याने त्यातील संपूर्ण चिखल हा सायकल ट्रॅकवर येऊन पडला आहे. त्यामुळे येथे वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. आता अधूनमधून पाऊस ही सुरू झाल्याने संपूर्ण सायकल ट्रॅकवर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तर तिथे गाळ असल्याने मुख्य रस्त्यावर जाऊन काही नागरिक चालतात त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता आहे असेही नागरिकांनी सांगितले आहे.

सायकल ट्रॅकवर एक मोकळा श्वास व व्यायाम होण्याच्या दृष्टीने नागरिक येत आहेत. मात्र संपूर्ण दुर्गंधी युक्त गाळ हा ट्रॅकवर पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे. पालिकेने नागरी आरोग्याचा विचार करता तातडीने ट्रॅकची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गाळ उचलून नेण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे. मात्र ठेकेदाराचा या कामात निष्काळजीपणा व वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आगरी कोळी सेनेचे जिल्हाध्यक्ष भुपेश कडुलकर यांनी केला आहे. गाळ उचलताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. याआधी संपूर्ण गाळ हा झाडांच्या मुळावर टाकून देण्यात आला होता. याबाबत स्वच्छता निरीक्षक व प्रभागीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ओला गाळ उचलताना रस्ते खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो सुकून गेल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. सनसिटीच्या रस्त्यावर गाळ पडल्याची तक्रार आली असून त्याठिकाणचा रस्त्यावर पडलेल्या गाळ काढून स्वच्छता केली जाईल. – नानासाहेब कामठे, उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन)

शहरबात: शहराला अमली पदार्थाचा विळखा

वसई विरार व मीरा भाईंदर शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. यावरूनच अमली पदार्थांची पाळेमुळे अगदी खोलवर रुजत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अजूनही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने या अमली पदार्थाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील काही वर्षात वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती यामुळे अनेक जण निवाऱ्यासाठी दाखल होत आहेत.

शहरात उभी राहणारी अनधिकृत झोपड्या या सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचा निवारा असला तरी दुसरीकडे याच अनधिकृत झोपड्यांचा व इमारतींचा आसरा घेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं ही यात आश्रयाला येत आहेत. विशेषतः विदेशी नागरिक ही शहरात दाखल होत आहे. आणि याच विदेशी नागरिकांचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेषतः नालासोपारा हे शहर सर्वाधिक गर्दीचे आणि वाढत्या लोकसंख्येचे आहे.सर्वाधिक गुन्हे याच भागात घडत असल्याचे अनेकदा पोलीस कारवायामधून समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून नालासोपारा भागातून अमली पदार्थाच्या तस्करी होण्याच्या मोठं मोठ्या घटना उघड झाल्या आहेत. चक्क नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर भागात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना घरातच चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

एक नायजेरियन महिला तिच्या साथीदाराच्या साहाय्याने घरातच एमडी नावाचा अमली पदार्थ तयार करून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. अवघ्या सहा दिवसात सुमारे १० कोटी रुपयांचे अमली पदार्थ या भागातून जप्त करण्यात आले होते. त्यामुळे वसई विरार आणि मिरा भाईंदर शहराला अमली पदार्थाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारांवर स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा यांच्या मार्फत कारवाई केली जाते.

मागील दोन वर्षात सुमारे दीड हजाराहून अधिक अमली पदार्थ विरोधी कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. यावरूनच दोन्ही शहरात अमली पदार्थाचा वापर याची व्यापकता लक्षात येते. दुसरीकडे सततच्या कारवायामुळे ही या अमली पदार्थ तस्करीचे प्रमाण कमी होण्याऐवजी ते वाढतच असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः अमली पदार्थामध्ये अफू, गांजा, कोकेन, एमडी ( मेफेड्रोन) अशा अमली पदार्थ आढळून येत असून त्याच्या कोट्यवधी रुपयांचा घरात रक्कमा आहेत.

शहरातील काही भाग आता अमली पदार्थांची केंद्र बनू लागली आहेत. यात तुळींज, संतोष भुवन, प्रगतीनगर अलकापुरी, आचोळे, डोंगरी, भीम डोंगरी, शिर्डीनगर. बिलालपाडा, मोरे गाव तलाव परिसर, अगरवाल नगर अशी प्रामुख्याने ठिकाणे आहेत.अशा ठिकाणांना आता लक्ष्य करण्याची वेळ आली आहे. छुप्या मार्गाने होणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यवहारात पोलिसांचा ही छुपा पाठींबा असल्याचे मध्यंतरी उघड झाले होते. त्यामुळे पोलिसांचा सहभाग हा देखील एकप्रकारे चिंतेचा विषय आहे.अशा प्रकारे जर पोलीस यंत्रणा छुपा पाठींबा देत असेल तर अमली पदार्थ विक्रेत्यांची चलती आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

वसई विरार व मीरारोड अशा ठिकाणच्या भागात मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक वास्तव्यास आले आहेत. वसई, विरारमधील विशेषतः नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

शहरात घडणाऱ्या अमली पदार्थ विरोधी कारवाया मध्ये नायजेरियन आणि परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे गुन्ह्यातील तपासादरम्यान दिसून पोलिसांना आले आहे. अनेक अमली पदार्थांच्या कारवाया मध्ये नायजेरियन नागरिकच प्रमुख आरोपी सापडले आहेत. नुकताच नालासोपाऱ्यात ज्या मोठ्या कारवाया झाल्या त्यात तीनही आरोपी नायजेरियन असल्याचे आढळून आले होते. मात्र त्यावर निर्बंध घालण्यात ही पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे.मध्यंतरी त्यांच्या या उपद्रवाला आळा घालण्यासाठी भाड्याने भर देताना आणि बेकायदा वास्तव्य असलेल्या नागरिकांची माहिती घरमालकाने पोलिस ठाण्यात देणे पोलिसांनी बंधनकारक केले होते.मात्र त्यानंतर ही अनेक परदेशी नागरिक विना परवाना शहरात राहत आहेत.

अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालायचा असेल तर आधी त्याचे मुळ शोधून काढून त्यावर कारवाई करणे गरजेचे बनले आहे. यापूर्वी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून अनेक बेकायदेशीर पणे राहणाऱ्या नागरिकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पुन्हा एकदा तशीच मोहीम राबवून अमली पदार्थाच्या अड्ड्याचा शोध घ्यायला हवा तसे न झाल्यास आगामी काळात शहराची अमली पदार्थांचे शहर अशी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

विविध प्रकारचे अमली पदार्थ शहरात आता सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यामुळे तरुण पिढी मध्ये ही व्यसनाधीनता अधिकच वाढत आहे. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा या अमली पदार्थांच्या सेवनाला बळी पडत आहेत. दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत असल्याने आगामी काळात त्याचे आणखीनच विघातक असते परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. यासाठी अशा प्रकारच्या अमली पदार्थांचे समूळ पणे उच्चाटन होण्यासाठी प्रशासनाने ही योग्य ती कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

अमली पदार्थांचे प्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासना तर्फे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम पोलिसांनी राबविण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.मात्र वसई विरार मीरा भाईंदर शहरात पोलीसांनी ही या मोहिमेची प्रभावी पणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.अमली पदार्थ खरेदी विक्रीची ठिकाणे, शहरात अमली पदार्थ येतात कुठून त्याचे धागेदोरे कोणते आहेत ? , कच्चा माल पुरवठा, यात सहभागी असलेल्या नागरिकांचा सखोल तपास व कारवाई तरच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.